"पुढील तीन वर्ष पक्ष विस्तार आणि संघटना बळकटीकरण", श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश
सोलापूर : काही जिल्हा परिषदा वगळता राज्यात पुढील तीन वर्ष निवडणूक नाही. या काळात पक्ष विस्तार आणि संघटना बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले. खासदार डॉ. शिंदे ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी सोलापूर, माढा, धाराशीव या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. या बैठकीला मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील उपस्थित होते. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले भगिरथ भालके, अनिल सावंत यांचे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी स्वागत केले.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्यभरात शिवसेना संपर्कप्रमुख फिल्डवर काम करत आहेत. प्रत्येकाला लोकसभा मतदार संघांची, जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबई, ठाणेमधील लोकसभा मतदार संघाच्या आढावा नंतर छत्रपती संभाजी नगर, पुणे जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेतल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. आज सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी असा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद गटनिहाय, पंचायत समिती गटनिहाय आणि महापालिका वॉर्डनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. संघटनात्मक ताकद वाढवली पाहिजे, शिवसेनेची ताकद गावागावात वाढली पाहिजे, यासाठी हा दौरा होत आहे. या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे बारीक लक्ष असल्याचे ते म्हणाले.
लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकात शिवसेनेला चांगलं यश मिळालं. आता उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकात देखील शिवसेना ताकदीनं उतरेल, असे ते म्हणाले. संघटनेच्या पातळीवर कार्यकर्ता, पदाधिकारी कसे काम करत आहेत, शाखा विस्तार होतोय का, अनेक वर्ष पद घेऊन बसेलेले काम करतात की नाही, याचा आढावा संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून घेतला जाईल. या दौऱ्याचा अहवाल मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असे ते म्हणाले.






