
फोटो सौजन्य - Social Media
रिसोड : आषाढी वारीनिमित्त शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी रिसोड शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. दुपारी सुमारे ३.४५ वाजता पालखी शहरात दाखल होताच संपूर्ण परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मालेगाव नाका, लोणी फाटा, चाफेश्वर संस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हिल लाईन आणि नगर परिषद मार्गाने पालखी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहोचली. येथे समितीचे सभापती, उपसभापती, सचिव तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. रिसोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही पालखीचे पूजन करून श्रींचे दर्शन घेतले.
पालखीच्या स्वागतासाठी नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी आणि नागरिकांनी विशेष व्यवस्था केली होती. वारकरी आणि भाविकांना बिस्कीट, पिण्याचे पाणी, उसळ, चहा, शरबत आणि ड्रायफ्रूटचे वाटप करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी सुमारे ७०० वारकऱ्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रसादासाठी तब्बल ४० हजार मोतीचूर लाडू तयार करण्यात आले होते. याशिवाय बेसन, भाजी आणि पोळीचाही महाप्रसाद वारकऱ्यांना देण्यात आला. विविध सामाजिक संस्था, व्यापारी आणि स्वयंसेवकांनी महाप्रसाद वितरणात सक्रिय सहभाग घेतला.
पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक निकेश घाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासह सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली.
श्री संत गजानन महाराजांची पालखी २१ जून रोजी शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मेडशी, डव्हा, शिरपूर, मसला पेन आणि रिसोड असा प्रवास पूर्ण करून पालखीने जिल्ह्यातील चौथा आणि अखेरचा मुक्काम रिसोड येथे केला. बुधवारी पहाटे ५ वाजता पालखी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगावकडे प्रस्थान करणार असून पुढील प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू राहणार आहे.