सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सन 2021-22 या वर्षात सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने माता आणि बाल आरोग्य निर्देशकांमध्ये राज्यात चौथे स्थान मिळवले आहे. याबाबत अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांनी 21 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांचे अभिनंदन केले आहे.
पहिल्या तीन जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्याचे लक्ष्य खूप मोठे होते. सोलापूर जिल्ह्याने सुमारे 65 हजारपेक्षा अधिक माता आणि मुलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविली आहे. निर्देशकांमध्ये ANC काळजी, तपासणी, रुग्णालयात प्रसूती, पूर्णपणे संरक्षित बालक आणि त्यांच्या माता यांच्यापासून मूलभूत माता आणि बाल निर्देशक समाविष्ट आहेत. यामध्ये तीव्र रक्तक्षय असलेल्या मातांवर उपचार, लसीकरण यांचाही समावेश आहे. थोडक्यात NITI आयोग इंडिकेटर, ज्यांचे GOI द्वारे परीक्षण केले जाते.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविडच्या कठीण काळात कोविड प्रतिबंधात्मक व कोविड लसीकरण ही कामे सांभाळत असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर आरोग्य सेवाही तेवढ्याच तत्परतेने दिल्या आहेत. असे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले.
या यशाचे खरे शिलेदार आमचे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका आहेत. याबद्दल मी सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
– दिलीप स्वामी, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर.