फोटो सौजन्य - Social Media
माथेरान शहरात सुरू असलेल्या वीज खंडिततेच्या समस्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिय्या आंदोलन पुकारले होते. सततच्या वीजपुरवठा अडचणीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले होते. मनसेच्या आंदोलनाची दखल घेत महावितरण कंपनीने लेखी आश्वासन देत नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील विजेची कामे पुढील एक महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, माथेरान शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी दोन प्रस्तावांना अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळाल्यावर कामे तातडीने सुरू केली जातील. त्यामुळे मनसेने आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
माथेरानमध्ये एप्रिल व मे महिन्यात पर्यटन हंगाम असतो. मात्र या काळात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक व्यवसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शहरातील वीज रोहित्र उघड्यावर असल्यामुळे आणि घाटमधील विजेच्या तारा झाडांमुळे तुटल्याने पुरवठा वारंवार खंडित होतो.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते भूषण सातपुते, आसिफ खान, संदीप कोष्टी, सुरेश कळंबे आणि अन्य कार्यकर्त्यांनी महावितरणच्या माथेरान येथील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाला माजी मराठा समाज अध्यक्ष बिना कदम यांनीही पाठिंबा दिला.
सहायक अभियंता सचिन आटपाडकर आणि कर्जत उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत समाधानकारक उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नेरळ-माथेरान घाटातील कामे १५ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. यासाठी दर मंगळवारी नियोजितपणे वीज पुरवठा बंद ठेवून दुरुस्ती केली जाईल. तसेच शहरातील उघड्या वीज रोहित्रांना बंदिस्त करण्यासाठी लागणारे बॉक्स माथेरानमध्ये पोहोचले आहेत. महावितरणच्या लेखी आश्वासनामुळे ठिय्या आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून, आता प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.