ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात 665 बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई
ठाणे: आज शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात 665 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभागसमितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होडिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आयुक्तांच्या निर्देशानुसार हटविण्यात येत असून ही मोहिम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभागसमितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
नौपाडा प्रभाग समिती – 76
कोपरी प्रभाग समिती – 54
वागळे इस्टेट प्रभाग समिती – 55
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 66
वर्तकनगर प्रभाग समिती – 65
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती – 67
उथळसर प्रभाग समिती – 53
कळवा प्रभाग समिती – 72
मुंब्रा प्रभाग समिती – 75
दिवा प्रभाग समिती 82