
Someshwar Sugar Factory, Yugendra Pawar, Baramati, Pune News,
मतदानासाठी वेळ लागत असल्याने काही ठिकाणी मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र, एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तीन पॅनेलमधून एकूण ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक जागेसाठी चुरशीची लढत झाली. सभासदांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पॅनेलचे नेते, उमेदवार आणि कार्यकत्यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे मतदान केंद्रांच्या परिसरात दिवसभर राजकीय हालचालींना वेग आला होता. मतमोजणीत मतदारांनी कोणाच्या पारड्यात कौल टाकला, हे स्पष्ट होणार असून, सोमेश्वर कारखान्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरुवातीला बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी निवडणुकीत उतरत तिसरे पॅनेल उभे केले आणि निवडणुकीत चुरस निर्माण केली. मतदारसंघ पिंजून काढताना त्यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा सकारात्मक प्रचारावर भर दिला. ज्येष्ठ नेत्यांच्या सक्रिय सहभागाविना त्यांनी एकहाती निवडणुकीची धुरा सांभाळत सोमेश्वरची खिंड लढवली.
या निवडणुकीत युगेंद्र पवार यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची अपेक्षित सक्रिय साथ मिळाली नाही. तरीही त्यांनी प्रचारात सातत्य राखत सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तालुक्याच्या जिरायती भागात त्यांच्या पॅनेलला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. अशा परिस्थितीत युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या ताकदीवर प्रचाराची आघाडी सांभाळली. तिसरे पॅनेल उभे करून त्यांनी निवडणुकीत निर्माण केलेली चुरस आणि जिरायती भागातील प्रतिसाद यामुळे त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच अत्यंत चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळाली. एकूण २१ जागांसाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनल आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनल यांच्यात ही थेट लढत झाली.
Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकी
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकत्यांशी चर्चा केली. दुसरीकडे, युगेंद्र पवार तसेच पुरुषोत्तम जगताप यांनीही ठिकठिकाणी जाऊन सभासदांशी संवाद साधला.
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सभासदांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे आता मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाघळवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नॉलॉजी येथील मतदान केंद्रावर ‘ब’ वर्गातून मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक जीवनाशी निगडित महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे कारखान्याच्या भविष्यासाठी प्रत्येक सभासदाचे मत मोलाचे आहे.’सोमेश्वर कारखान्याच्या सर्व सभासद मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.