सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी (फोटो - टीम नवराष्ट्र)
“सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ११ वर्ष अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्यावर असंख्य अत्याचार करण्यात आले. इतिहासात ज्यांचे नाव स्वातंत्र्यवीर म्हणून नोंदलं गेलं त्यांना माफीवीर अशी खालच्या पातळीची टीका राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने करतो,” असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींना जोडे मारण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. सोनियांचे पुस्तक स्वीकारल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची नाक रगडून माफी मागावी.’
“‘बिलॉंगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील पान क्रमांक २०१ वर सोनिया गांधी यांनी सावरकर सातत्याने ब्रिटीश सरकारकडे शिक्षा कमी करण्यासाठी माफीची पत्रे लिहित होते, असा उल्लेख केला आहे. तसेच पान क्रमांक ४४३ वर सावरकरांनी गांधीजींच्या भारताविषयीच्या संकल्पनेविरोधी भूमिका घेतली, असा उल्लेख केला. या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष, संघ परिवार यांच्याबद्दल एक फेक नरेटिव्ह मांडल्याची टीका शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी केली. सोनिया गांधी यांचे पुस्तक हे जर्नी ऑफ लव्ह नाही तर लव्ह जिहाद आहे, अशी टीका त्यांनी केली. या पुस्तकातून सोनिया गांधी यांनी मराठी साहित्यिकाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान केलाय,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, “काश्मिरातील जमीन पाकिस्तानने जेव्हा गिळली, राजीव गांधीजींच्या काळात शिखांच्या दंगली झाल्या. बोफोर्स घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, यूपीएच्या काळात वाढलेला दहशतवाद, मुंबईवरील २६/११ चा हल्ला, यासाठी सोनियांनी माफी का मागितली नाही,” असा सवाल घाडी यांनी केला. “बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखवतील का,” असा खरमरीत सवाल घाडी यांनी केला. “सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोनिया यांनी इटलीला परत जावे,” असा खोचक टोला घाडी यांनी लगावला.
संजय निरुपम यांनीही यावेळी सावरकरांचा वारंवार करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “सोनिया गांधी यांनी संसदेतील सावरकरांच्या तैलचित्राच्या स्थापनेला विरोध करणारे पत्र राष्ट्रपतींना दिले होते. सोनिया गांधी या पुस्तकात प्रेमाबद्दल बोलतात मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मनात हिंदू धर्म आणि हिंदू नेत्यांविषयी द्वेष आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. सोनिया यांच्या आत्मचरित्रावर बंदी घालावी,” अशी मागणी निरुपम यांनी केली.






