फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती संभाजीनगर : महाकुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु आहे. जानेवारीमध्ये प्रयागराज येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक येथे गेले होते. आता त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातून जवळपास साडेआठ लाख प्रवाशी परतले आहेत. यात मराठवाड्यातील प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे.
26 फेब्रुवारीपर्यंत ही संख्या दुप्पट होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी प्रयागराज येथून 330 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर सोमवारी 191 रेल्वेगाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. नागपूर-दानापूर दरम्यान आणखी गाड्या चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे नागपूर-दानापूर-नागपूर मार्गावर 12 विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. तरीही प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता 26 फेब्रुवारीपर्यंत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर-दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
तिकिट तपासणी मोहिम राबवणार
रेल्वे गाडीत आरक्षित डब्ब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे तिकीट काढून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी आता मध्य रेल्वेतर्फे कुंभमेळा विशेष गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली.
लाखों भाविकांचा प्रवास
आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून रेल्वे स्थानकांवरून जवळपास साडेआठ लाख प्रवाशांनी महाकुंभसाठी प्रवास केला आहे. प्रयागराज येथून ३३० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातील जवळपास ५० गाड्या नागपूर व मुंबईत पोहोचल्या. रेल्वेगाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
भाविक परतू लागले
कुंभ मेळ्यातील शाही स्नान आटोपल्यावर मराठवाड्यातील अनेक भाविक आता नागपूर, मुंबईमार्गे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रेल्वेस्थानकावर परतत आहे. जनशताब्दी, तपोवन, देवगीरी व रातराणी एक्सप्रेस या प्रवाशांमुळे हाऊसफुल झाल्या आहेत.