एसटीच्या आर्थिक संकटात झाली वाढ; दरवाढीनंतर उत्पन्नात घट, पाच दिवसांत 'इतक्या' कोटींचे नुकसान (फोटो सौजन्य-X)
अमरावती : एसटी महामंडळाने २०२५ च्या सुरुवातीला दरवाढीचा निर्णय घेत, दररोज ३२ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न लक्ष्य ठरवले होते. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत केवळ २७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. उद्दिष्टाच्या तुलनेत ५ कोटी ३६ लाख रुपयांचा दैनंदिन तोटा म्हणजेच पाच दिवसांत सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
विभागनिहाय आकडे पाहता, अमरावती विभागाने ८२.१२ कोटींच्या उद्दिष्टापैकी ६७.४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत ८२.१७ टक्के कामगिरी केली. अकोला विभागाने ८०.३२ कोटींपैकी ६६.७३ कोटी (८३.०७ %), यवतमाळने ९०.०४ कोटींपैकी ७३.४३ कोटी (८१.५५%) तर बुलढाणा विभागाने ९५.५२ कोटींपैकी ७६.७८ कोटी (८०.३८%) इतकेच उत्पन्न साध्य केले. कोणत्याही विभागाने ९० टक्के पेक्षा जास्त लक्ष्य पूर्ण केले नाही.
दरवर्षी जून-जुलै महिन्यात उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊन महसूल उद्दिष्ट साध्य होते. मात्र, यावर्षी दोन्ही महिन्यांतच अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, ऑगस्टमध्येही ही नकारात्मक प्रवृत्ती सुरू आहे. दरमहा सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांच्या किंमत भरपाईतून वेतन दिले जात असले तरी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी आणि पगारवाढीतील फरक प्रलंबित आहेत.
पगारातून कापलेली २५०० कोटी रुपयांची रक्कम तसेच बीएफ आणि राजपत्र निधी ट्रस्टकडे न जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. आकडेवारी सूचित करते की, प्रवासी संख्या आणि उत्पन्न यातील दरी भरून काढण्यासाठी कोणतीही ठोस रणनीती राबवली नाही, तर पुढील महिन्यांत एसटीचा तोटा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना दिल्या जातात विविध सवलती
एसटी महामंडळ वेगवेगळ्या ३१ प्रकारच्या सवलती प्रवाशांना देत असून त्याचा परतावा सरकारकडून एसटीला करण्यात येत आहे. पण सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी सवलतीच्या प्रवासी संख्येवर शंका उपस्थित केली असून, या प्रवासी संख्येचे व सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेचे सध्या ऑडिट सुरू करण्यात आले आहे.