
अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः कोकणातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक मार्ग बंद झाले, तर रायगड जिल्ह्यातील रोहा आगार सलग दोन दिवस पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचणे शक्य झाले नाही.
बरगे यांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत राज्य सरकार किंवा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष रजा मंजूर करण्याबाबत परिपत्रक काढले जाते. मात्र यावेळी ना शासनाकडून, ना जिल्हा प्रशासनाकडून, ना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून कोणतेही परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, कोकण विभागातील कोणत्याही एसटी विभागाने पूरामुळे गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या विशेष रजेबाबतचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पूर्ण वेतन मिळावे म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खात्यातील अर्जित रजा वापरण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करून त्यांचे वेतन अबाधित ठेवावे, तसेच याबाबत तातडीने स्पष्ट आदेश काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, केळी व इतर पिके नष्ट होऊन ‘ओल्या दुष्काळा’चे संकट उद्भवते. जमिनीची धूप होऊन सुपीक माती वाहून जाते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पंचनामे करून हेक्टरी मदत व पीकविम्याद्वारे आर्थिक भरपाई दिली जाते.