एसटी कामगारांचे 'बोंब मारो' स्थगित (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता न मिळाल्याने असंतोष पसरला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध करत ‘बोंब मारो’ आंदोलनाची नोटीस एसटी कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली होती. मात्र, आता सदर निधी देण्यास अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्याने तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटी देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आझाद मैदानात होणारे ‘बोंब मारो’ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
सततचा पाठपुरावा करून देखील वित्त मंत्रालयाकडून निधी मंजुरीसाठी टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार त्रुटी काढून निधी देण्यात खोडा घातला जात होता. आता अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात अनुकूलता दर्शविली असून, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्याचा वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित हप्ता लवकरच मिळेल, अशी अपेक्षा बरगे यांनी व्यक्त केली आहे. अर्थ खात्याकडून १०० कोटींना मंजुरी मिळाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरक हप्ता मिळणार
सध्या तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून, २४ फेब्रुवारी रोजी, आझाद मैदान, मुंबई येथे होणारे ‘बोंब मारो’ आंदोलन होणार नाही. निधी मंजुरी बद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी
एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
हेदेखील वाचा : आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप






