चंद्रपूर : चंद्रपूर शहरात कमाल तापमानात अचानक 41.2 ने वाढ झाल्यानंतर शनिवारी (दि. 30) सायंकाळपासून सिंदेवाहीसह चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथे झालेल्या जोरदार पावसामुळे तापमानात घट झाली. मात्र, रविवारी (दि. 31) पुन्हा एकदा पारा 40.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे रात्री जरी पाऊस झाला असला, तरीही रविवारी दिवसभर उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने लोक हैराण झाले होते.
रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. परंतु, सकाळी अकरानंतर पुन्हा कडक उन्हाचा तडाखा सुरू झाला. शनिवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन जिल्ह्यातील सिंदेवाही परिसरात सायंकाळी दमदार पाऊस झाला. यानंतर बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा येथे रात्री 10 नंतर हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रविवारी कमाल तापमानात घसरण होईल असे वाटत होते. मात्र, रविवारी सकाळी पुन्हा सूर्य तळपताच दुपारी चांगलाच उकाडा जाणवत होता. सायंकाळ उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती.
पारा वाढल्याने घरे, दुकाने, कार्यालयांमध्ये कुलर व वातानुकूलित उपकरणांचा वापर सुरू होता. दुपारनंतर रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक सार्व ठिकाणांवरील गर्दी कमी होऊ लागली. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अत्यावश्यक काम असेल तेव्हाच लोक घराबाहेर पडत आहेत.
निवडणूक प्रचाराच्या वेळातही बदल
ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक होत असल्याने दुपारच्या उन्हाचा तडाखा पाहता निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारात बदल केले आहेत. शनिवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने रिंगणात असलेल्या 15 उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.