लोणावळा : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अनया अथर्व कांबळे (वय-२३, रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील संजय चंद्रकांत क्षीरसागर (रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरा अथर्व महेश कांबळे, सासरे महेश कांबळे, सासू वैशाली कांबळे, नणंद साक्षी कांबळे (सर्व रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा) यांना अटक केली आहे.
विवाहितेचे वडील संजय क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी अनया हीला तिच्या सासरकडील मंडळी वेळोवेळी कपड्यावरून, बोलण्यावरून टोमणे मारून हिणवत होते. लग्नामध्ये मान- पान केला नसल्याच्या कारणावरून व लग्नात पाहिजे तेवढा हुंडा दिला नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास देत तिचा छळ करत असत, त्यातूनच तिने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी घरगुती हिंसाचार कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत कांबळे कुटुंबीयांना अटक केली. शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्यांना बेदम मारहाण करत घरातील सामानाची, मोटारींची तोडफोड केली.