बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधानभवनात राज्यसभा सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याने बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र या पराभवानंतर राज्यसभा सदस्यत्व पदासाठी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस साठी ही दिलासादायक बाब असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. औपचारिक घोषणा बाकी आहे. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर निराश असलेल्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी पेढे वाटण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, युवकचे अध्यक्ष अविनाश बांदल, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, अभिजीत जाधव, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अनिता गायकवाड, प्रताप पागळे, अभिजीत काळे, श्रीकांत जाधव, ॲड धीरज लालबिगे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान बारामती शहरातील इतर ठिकाणीही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.