Superintendent Of Excise Department Taken Into Custody By Acb A Bribe Of 1 Lakh Was Taken Nrdm
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एसीबीच्या ताब्यात; ‘या’ कारणासाठी घेतली होती १ लाखांची लाच
एक लाख रूपयांची लाच घेऊन फरार झालेल्या चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार जयसिंगराव पाटील यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहाटे महाबळेश्वर तालुक्यातील भिलारमधून अटक केली. या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
वाई : एक लाख रूपयांची लाच घेऊन फरार झालेल्या चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार जयसिंगराव पाटील यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहाटे महाबळेश्वर तालुक्यातील भिलारमधून अटक केली. या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणातील तक्रारदार यांचा (घुग्घूस जि. चंद्रपूर) येथे एक बिअरबार आहे. त्यांना नवीन बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात परवान्यासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अधीक्षक संजयकुमार पाटील व निरीक्षक चेतन खरोडे यांनी परवाना देण्यास टाळाटाळ केली. या परवान्यासाठी खरोडे याने संजय पाटील व स्वतः साठी तक्रारदारांकडे १ लाख रूपयांची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संजय पाटील व चेतन खरोडे यांनी कार्यालय अधीक्षक अभय खताळ याच्यामार्फत १ लाखांची लाच स्वीकारली. यावरून संजय पाटील, चेतन खरोडे व अभय खताळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणात सहभाग
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची चौकशी करून आठवडाभरापूर्वी ७ मे ला सापळा रचून त्याच कार्यालयातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना एक लाख रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक संजयकुमार पाटील यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
रिसॉर्टवर टाकला छापा
गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पाटील हा पसार होता. पाटील हा भिलार येथील एका रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे दीड वाजता रिसॉर्टवर छापा टाकून संजय पाटील याला अटक केली. चंद्रपूरच्या राज्य उत्पादनच्या अधीक्षकाला भिलारमधून अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Superintendent of excise department taken into custody by acb a bribe of 1 lakh was taken nrdm