फोटो सौजन्य - Social Media
गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची (LMEL) सुरजागड आयर्न ओर माइन ही देशातील पहिली ‘ग्रीन माइन’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे खाणकामातील कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. खाणीत दरवर्षी 32,000 टन CO2 उत्सर्जनात घट झाली आहे, आणि ही संख्या ५०,००० टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे यश मुख्यत्वे अक्षय ऊर्जेचा वापर, कार्बन उत्सर्जन कमी करणारे उपक्रम, आणि पर्यावरणस्नेही यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शक्य झाले आहे.
एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्पष्ट केले की, कंपनीचा भर ग्रीन स्टील उत्पादन, कार्यक्षमतेत सुधारणा, नवकल्पना आणि स्थानिक सहभाग यावर आहे. ही दिशा भारताच्या ‘नेट झिरो’ वचनबद्धतेशी सुसंगत आहे. विकास आणि शाश्वतता यांच्यात योग्य समतोल राखत कंपनी ‘सर्वांसाठी हरित भविष्य’ या ध्येयासाठी काम करत आहे.
सुरजागड खाणीतील एक उल्लेखनीय पाऊल म्हणजे हरित वाहनांचा वाढता ताफा. ३४ पासून सुरू झालेला इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा ५६ पर्यंत पोहोचला असून, २०२५-२६ पर्यंत तो १०० हून अधिक वाहनांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. हे वाहन वायू प्रदूषण कमी करतात, आरोग्यसेवा खर्च घटवतात, आणि इंधन आयातीतून भारताच्या अवलंबित्वात घट करतात. याशिवाय, कंपनीने जगातील पहिले इलेक्ट्रिक कंप्रेसर एक्स्कॅव्हेटर माउंटेड ड्रिल विकसित केले आहे, जे डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे. एलएमईएलने यंत्रे डिझेलवरून इलेक्ट्रिकवर रूपांतरित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला असून यामुळे उत्पादकतेत वाढ आणि सुरक्षा सुधारणा झाली आहे.
खनिज वाहतुकीसाठी LNG प्राइम मूव्हर्सचा वापर केला जात आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात LNG परिसंस्था उभारण्याचीही योजना आहे. कंपनीने अक्षय ऊर्जेसाठी सौर आणि पवन ऊर्जा पुरवठादारांशी करार केले असून, २०२५च्या दुसऱ्या तिमाहीपासून पुरवठा सुरु होईल अशी अपेक्षा आहे. या सगळ्या उपक्रमांमुळे सुरजागड खाण देशातील पर्यावरणपूरक खाणकामाचा आदर्श ठरत आहे.