आजारी आरोग्यसेविकेसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले; वेळेत उपचार मिळाल्याने प्राण वाचले (Photo : iStock)
गडचिरोली : गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आला आहे. अशा स्थितीत एका आरोग्यसेविकेची प्रकृती गंभीर झाली. याची माहिती होताच त्यांना हेलिकॉप्टर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी एका आजारी आराग्यसेविकेसाठी दाखवलेली तत्परता पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन घडवणारी ठरली.
भामरागड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरेवाडा गावातील आरोग्यसेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाली होती. नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने आणि रस्ते बंद असल्यामुळे त्यांचे प्राण धोक्यात आले होते. याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी समन्वय साधून ‘पवन हंस’ हेलिकॉप्टरची तातडीने मागणी केली. हेलिकॉप्टरने भामरागड येथे जाऊन त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात यशस्वीपणे पोहोचवले. त्यांच्या उपचाराला त्वरित सुरुवात करण्यात आली. या कामगिरीमध्ये प्रशासनासह पायलट डीआयजी श्रीनिवास व सहपायलट आशिष पॉल यांचे मोलाचे योगदान राहिले.
गडचिरोली पोलिस केवळ कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक नसून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात, याचा हा आणखी एक प्रत्यय आहे. काही महिन्यांपूर्वी अतिदुर्गम रासगुंडा येथे जखमी मजुराला हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात पोलिसांचे महत्त्वाचे योगदान होते.
हेलिकॉप्टरने पोहोचवली होती रक्ताची पिशवी
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भामरागडमध्ये असाच एक प्रसंग समोर आला होता. पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचविण्यात आली होती. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले.