संग्रहित फोटो
पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा व राज्यात महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयापासून दूर जाण्याचा कुठलाच प्रश्न नाही. पण आमच्यासोबत व मोदींच्या विचारांसोबत ते जोडू शकतात. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या १० जूनला बालेवाडी स्टेडियम येथे पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकांना महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष सामोरे जाऊ, मात्र प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. गेली आठ वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. तरुण कार्यकर्ता या निवडणुकीसाठी आस लावून बसला आहे, त्यामुळे त्यांचाही विचार तिन्ही पक्षांना करावा लागणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. आम्ही महापालिकानिहाय चर्चा करून निवडणुकीला स्वतंत्रपणे कुठे सामोरे जायचे याबाबत मार्ग काढू. मात्र या निर्णयातून महायुतीच्या ऐक्याला तडा जाणार नाही याची खबरदारी नक्की घेतली जाणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षही निवडणुकीला एकत्र सामोरे जातील, असे चित्र सध्यातरी दिसत नाही असेही ते म्हणाले.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सध्या चर्चेत असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. जे आरोप होत आहेत ते तथ्यहीन असून, केवळ आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करीत असल्याचे तटकरे म्हणाले. अनुसूचित जाती जमातीसाठी असलेला निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवला असल्याचा आरोप चुकीचा असून, उलट यावेळी राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीसाठी तीन हजार कोटी रुपये अधिकचे दिले आहे आणि जो निधी वळवण्यात आला आहे तो त्याच जाती जमातीतील लाडक्या बहिणींना वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याला राज्यातील कार्यकर्ते पदाधिकारी
पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याला राज्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व पक्षाचे सर्व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी चार वाजता मेळाव्याचा समारोप होईल. या मेळाव्यात आगामी वर्षातील नवीन आव्हाने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याबाबत मेळाव्यात उहापोह होणार आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात विकृत मनोवृत्तीपासून कार्यकर्त्यांना दूर राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. विकृत मनोवृत्ती ठेचून काढली पाहिजे याच विचारधारेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून, त्या दृष्टीनेच काहींवर पक्षाने कारवाई केली असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.