फोटो सौजन्य सोशल मिडिया
या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री. मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
मुंबईतील मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्क येथे शुक्रवार, ३० ऑक्टोबर ते रविवार, १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ॲड. सुशिबेन शाह म्हणाल्या की, या महोत्सवात ११० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादने, हस्तकला, स्थानिक उद्योजकांची उत्पादने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी २० हून अधिक मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, पपेट शोदेखील महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.
स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि नागरिकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. दिवाळीच्या खरेदीच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनांना आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा संदेश या महोत्सवातून दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. आनंदोत्सवाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री. मिलिंद देवरा उपस्थित राहणार आहेत. यावेळी नेत्या सौ. मीनाताई कांबळी, सौ. सीमा सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईकरांनी या तीन दिवसीय ‘स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६’ ला भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. सुशिबेन शाह यांनी केले आहे.






