टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 : बेरहानू सलग तिसऱ्यांदा विजयासाठी सज्ज, तर अबराश मिन्सेवो जेतेपद राखण्यास उत्सुक
मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरुष एलिट गटात 2023 आणि 2024 मध्ये बाजी मारल्यानंतर बेरहानू हा सलग तिसर्यांदा मुंबई मॅरेथॉन जिंकण्यास उत्सुक आहे. मागील दोन वर्षांची पुनरावृत्ती केल्यास मॅरेथॉनच्या 20 वर्षांच्या इतिहासात जेतेपदाची अनोखी हॅट्ट्रिक साधणारा तो पहिला धावपटू असेल. 2007 आणि 2008 मध्ये जिंकलेल्या केनियाच्या जॉन केलाईने यापूर्वी असा प्रयत्न केला होता. परंतु, 2009 मध्ये त्याला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. इथिओपियन महिला धावपटू मुलू सेबोकाने मुंबई मॅरेथॉन तीनदा जिंकली असली तरी तिसरे विजेतेपद मिळवण्यापूर्वी 2007मध्ये ती सहभागी झाली नव्हती.
पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस
एलिट पुरूष आणि महिला या दोन्ही प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना (फिनिशर्स) एकूण 389,524 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिसाच्या एकूण रकमेतून अनुक्रमे 50,000, 25,000 आणि 15,000 अमेरिकन डॉलर इतके बक्षीस मिळेल. एलिट गटात नवा स्पर्धा विक्रम रचणार्याला 15,000 डॉलरचे अतिरिक्त बक्षीस मिळेल. 2023 पासून इथिओपियाचा हेले लेमी बर्हानू (2:07:32 सेकंद) आणि अँचियालेम हेमनोटने (2:24:15 सेकंद) मॅरेथॉन रेकॉर्ड रचले आहेत. 2025 मॅरेथॉनमध्ये भाग घेणार्या अकरा पुरुष आणि सहा महिला धावपटूंची वैयक्तिक कामगिरी ही सध्याच्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धा विक्रमापेक्षा (कोर्स रेकॉर्ड) जास्त आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनची 20 वी आवृत्ती
एलिट अॅथलीट्सच्या उत्कृष्ट श्रेणीवर भाष्य करताना, प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग म्हणाले की, बर्हानु आणि मिनसेवो या गतविजेत्यांच्या पुनरागमनासह आम्ही टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 20व्या आवृत्तीमध्ये प्रवेश करत आहोत. ही रेस भारतातील लांब पल्ल्याच्या धावण्याच्या खेळाच्या यशासाठी प्रेरणादायी ठरली असून एलिट लाइन-अप ही टीएमएमच्या जगभरातील वाढत्या लोकप्रियतेची साक्ष आहे. रविवार, 19 जानेवारी रोजी जागतिक स्तरावरील सर्व अव्वल धावपटू त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आतुर आहेत.
बेरहानू व्यतिरिक्त एलिट पुरुष गटात केनियाचा फिलेमोन चेरोप रोनोचा समावेश आहे. ज्याने 2023 आवृत्तीमध्ये उपविजेतेपद पटकावले आहे. त्याच वर्षी नववे स्थान मिळवलेला एरिट्रियन मेरहावी केसेटे हा सुद्धा आहे. तथापि, 2020 हंगामात चांगली कामगिरी करणारा बहारिनचा अब्दी अली गेल्चू यंदा सहभागी होत आहे. मागील हंगामात तो पाचव्या स्थानी होता. 2016 मध्ये आशियाई ज्युनियर क्रॉस-कंट्री चॅम्पियन असलेल्या गेल्चूने इथिओपियामधून स्थलांतर केले आहे आणि 2014 पासून तो त्याचा दत्तक देश बहारिनचे प्रतिनिधित्व करत आहे.
बेरहानूला यंदाच्या हंगामात आव्हान देणारी दोन प्रमुख नावे म्हणजे त्याचे देश-मित्र असरार अबेररेहमान हियर्डन (2:04:43 सेकंद) आणि बाझेझ्यू अॅस्मारे (2:04:57 सेकंद) असून त्यांनी अलिकडच्या वर्षांत सर्वोत्तम वेळेची नोंद केली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 आवृत्तीच्या तयारीबद्दल बोलताना, बरहानू म्हणाला, गेल्या वर्षी मी कोर्स रेकॉर्डच्या अगदी जवळ होतो. यावेळी मला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा लाभला. मात्र, काही थोडक्यात स्पर्धा विक्रम हुकला. यावेळी कोर्स रेकॉर्ड करण्याचा माझा प्रयत्न राहील. यंदात त्यात यशस्वी होईल, असा मला विश्वास वाटतो.
एलिट महिला गटात गतविजेती अबराश मिन्सेवो जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. 2024 मध्ये पदार्पणात तिने 2:26:06 सेकंद अशी वेळ नोंदवणार्या या इथिओपियन खेळाडूने टीएमएम ही एकमेव मॅरेथॉन होणे पसंत केले. मात्र, यंदा जेतेपद राखण्यासाठी तिच्यासमोर जवळपास डझनभराहून अधिक धावपटूंचे आव्हान असेल.
तिच्या देशातील मुलू सेबोका आणि डिंकनेश मेकाश या फक्त दोन महिला धावपटूंनी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये दोनपेक्षा अधिक जेतेपदे पटकावली आहेत. यावेळी 2016मधील विजेती शुको जेनेमो (दोन वर्षांपूर्वी तिसरे स्थान) आणि फेयसा अदानेच अंबेसा (2023 मध्ये दहावे स्थान) पुन्हा एकदा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला ल्युब्लियानामध्ये(स्लोव्हाकिया) 2:20:17 सेकंद अशा वेेळेसह मॅरेथॉन जिंकणारी केनियाची जॉयस टेली आणि 2019 मध्ये त्याच शहरात 2:21:33 सह बहरीनची शिताये एशेटे या सुद्धा अव्वल स्थानासाठी दावेदार आहेत. जेनेमोने या वर्षाच्या सुरुवातीला बार्सिलोनामध्ये दुसरे स्थान मिळवताना 2:21:35 सेकंद अशी वेळ नोंदवली.त्यानंतर फ्रँकफर्टमध्ये तिसरे स्थान मिळवले. परिणामी, मिन्सेवोला आव्हान देण्यासाठीच्या रिंगणात ती सामील झाली.
इथिओपियाच्या टिगिस्ट गेटनेट (2:23:17 सेकंद, दुबई 2023), फेयसा अदानेच (2:24:07 सेकंद, पॅरिस 2022) आणि असिमरेच नागा (2:24:13 सेकंद, डब्लिन 2024) यांच्याकडूनही मिन्सेवोला चांगली चुरस मिळू शकते.
पदार्पणातच पहिले मॅरेथॉन विजेतेपद जिंकल्याने मी खूप आनंदी आहे. मुंबई हे भाग्यवान ठिकाण बनले आणि त्यानंतर मी इतरत्र कुठलीही मॅरेथॉन धावली नाही. 2025 मध्ये अनेक सर्वोत्तम धावपटू सहभागी होत असल्या तरी कामगिरीत सुधारणा करण्यासह विजेतेपद राखण्याचा मला विश्वास आहे, असे मिन्सेवोने म्हटले आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यापैकीच्या मॅरेथॉनपैकी एक आहे. जागतिक स्पर्धा जपानची राजधानी टोक्योमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये होईल.






