Navi Mumbai – सिद्धेश प्रधान : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत २८ प्रभाग असून १११ नगरसेवक असणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यत देण्यात आली आहे. मात्र या प्रभाग रचना जाहीर झाल्यावर ठाकरे गटाने मात्र यावर आक्षेप घेतला. भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार असल्याचे समीर बागवान यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप प्रभागरचना जाहीर केली असून या प्रभागरचनेत २७ प्रभाग हे ४ नगरसेवकांचे असून उर्वरीत १ प्रभाग हा ३ नगरसेवकांचा असणार आहे.पुढील काही दिवसात संबंधीत प्रभागरचनेची माहिती घेऊन हरकती सूचना येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत नवी मुंबई महापालिकेत १४ गावांच्या सहभागासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहेे. मात्र असे असले तरी प्रभागात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना १४ गावांची लोकसंख्या वाढून देखील पूर्वीइतकेच १११ वॉर्डच पालिकेने तयार केले असल्याने भुवया उंचावल्या आहेत. हरकती सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
१४ गावांचा समावेश नवी मुंबईत करू नये, यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी या ठाम विरोध केला होता. शासनाने ६ हजार कोटी विकासासाठी द्यावेत, अतिक्रमण हटवावे, नियोजन प्राधिकरण नेमावे आणि मगच या गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करावा अशी भूमिका नाईक यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप देखील केले होते. मात्र अखेर शिंदेंच्या आग्रही भूमिकेपुढे नाईकांना झुकावे लागल्याचे बोलले जात आहे
तर दुसरीकडे या १४ गावांमध्ये शिंदे गटाचे प्राबल्य असल्याने नाईक विरोध करत असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र यात १४ गावांमधील ग्रामस्थ भरडले जात होते. अखेर या ग्रामस्थांना नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. प्रारुप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक १४ मध्ये या १४ गावांचा समावेश आहे. जुन्या एमआयडीसी पावणे गाव, श्रमिकनगर अडवली भुतवली ,कातकरीपाडा तुर्भे स्टोअरमधील काही भाग तसेच गणपतीपाडा व वारलीपाडा या भागांचा सहभाग आहे.
उपशहरप्रमुख समीर बागवान म्हणाले की, निवडणुका आयोगाच्या अटी प्रभाग रचना तयार करताना पायदळी तुडवल्या गेल्या आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात ८ विभाग कार्यालये आहेत. प्रशासकीय दृष्ट्या नागरिक एका विभागाशी जोडले गेले आहेत. त्या विभागातील नागरिक त्या कार्यालयात जाऊन आपल्या स्थानिक नागरी समस्या मांडत असतात. त्याच विभाग कार्यालयाकडे हद्दीप्रमाणे त्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असते. मात्र प्रभाग रचनेत एका विभाग कार्यालयातील वॉर्ड दुसऱ्या विभाग कार्यालयात घुसविण्यात आले आहेत. उदा. सिवुडमधील नागरीक बेलापुर विभाग कार्यालयात जातात. तर प्रभाग रचनेत सिवुड भाग नेरूळ मध्ये जोडण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. भविष्यात दोन्ही ठिकाणी दोन पाय ठेवलेले असताना प्रभाग समितीचा कारभार कसा हाकला जाणार ? तसेच तुर्भे स्टोअर भागात तर बाजूबाजूला असलेले भाग आहेत. मात्र त्यातील एक भाग नेरुळशी तर दूसरा भाग डोंगर पार करून १४ गावांशी जोडला गेला आहे. अशा अनेक तक्रारी येत आहेत. प्रतिनियूक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना पालिकेची भौगोलिक स्थिती माहीत नसल्याने पालिका अधिकाऱ्यांनी देखील त्याचा फायदा घेत राजकीय पक्षांना मदत केल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. या बाबत आम्ही लढा देणार आहोत.