फोटो- (istockphoto)
ठाणे: बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना आता पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान त्या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेचे संस्थाचलक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यांना पोलिसांनी जवळपास महिन्याभराच्या तपासानंतर अटक केली आहे. आज या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने शाळेच्या संस्थाचालकांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हायकोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व जामीन
बदलापूर येथे एक शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात या फरार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मुंबई पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सुनावणीमध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत. तक्रारदार, याचिकाकर्ते आणि त्यांचे वकील यांना सुरक्षा देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीत अक्षय शिंदे याने चालवलेली गोळी पोलिस गाडीच्या आरपार गेल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. त्यावर या गोळ्या शोधण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे.