फोटो सौजन्य - Social Media
ठाणे : ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले कळवा उपनगर आज गंभीर मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे. विशेषतः वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येथे होत असलेल्या वारंवार वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वीजपुरवठा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उकाड्याची तीव्रता जाणवत असताना, कळव्यातील अनेक भागांमध्ये तासन्तास वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
कळव्यातील खारीगाव, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा आणि घोलाईनगर या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एकदा वीज गेल्यानंतर ती पुन्हा येण्यासाठी तब्बल ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे, ही वीज खंडिती बहुतेक वेळा दुपारच्या कडाक्याच्या उन्हात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घरामध्ये लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी रुग्ण असलेल्या कुटुंबांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. अनेकजण रात्रपाळीत काम करून सकाळी किंवा दुपारी घरी विश्रांतीसाठी येतात. मात्र, याच वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. “आम्ही रात्रभर काम करून थकून घरी येतो, पण वीज नसल्यामुळे विश्रांती मिळत नाही. अशा परिस्थितीत आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वृद्ध नागरिक आणि रुग्णांसाठीही ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. वाढत्या उष्णतेत पंखे, कुलर किंवा एसी यांसारख्या साधनांशिवाय राहणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना औषधोपचारांसाठी स्थिर तापमानाची आवश्यकता असते, मात्र वीज नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही नागरिकांनी अशीही भीती व्यक्त केली आहे की, जर या परिस्थितीत एखादी गंभीर घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
स्थानिक नागरिकांच्या मते, ही समस्या नवीन नसून दरवर्षी उन्हाळा सुरू होताच वीजपुरवठ्यातील अडथळे वाढतात. मात्र, यावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. “प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की वीजेचा हा लपंडाव सुरू होतो. आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, पण परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही,” असेही काही नागरिकांनी सांगितले.
याशिवाय, वीजपुरवठा खंडित होण्यामुळे घरगुती कामांवरही परिणाम होत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडणे, तसेच ऑनलाइन कामे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण यावरही त्याचा परिणाम होत आहे. सध्या अनेक कामे डिजिटल माध्यमांवर अवलंबून असल्यामुळे वीज नसणे म्हणजे संपूर्ण कामकाज ठप्प होणे होय.
कळवा उपनगराचा विकास करताना नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात वीजसारख्या अत्यावश्यक सेवेतच सातत्याने अडथळे येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाकडे नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच, वीज खंडितीचे अचूक वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून नागरिकांना पूर्वकल्पना मिळू शकेल, अशीही मागणी पुढे येत आहे. अन्यथा, येत्या काळात नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






