प्राचीन बाणगंगा तलावाने घेतला मोकळा श्वास! पालिकेने दिलेल्या कृत्रिम तळ्यांच्या पर्यायामुळे सर्वपित्री अमावस्या ठरली प्रदूषणमुक्त
Mumbai News: दरवर्षी सर्वपित्री अमावस्येनंतर निर्माल्याचे थर आणि मृत माशांच्च्या दुर्गंधीने विद्रूप होणाऱ्या दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे चित्र यंदा पूर्णपणे पालटले आहे. पालिका प्रशासनाची काटेकोर नियोजनबद्धता, स्थानिक रहिवाशांचे सहकार्य आणि पूजाविधी करणाऱ्या पंडितांच्या सकारात्मक भूमिकेमुळे यंदा बाणगंगेने प्रथमच पूर्णपणे प्रदूषणमुक्तीचा मोकळा श्वास घेतला. थेट तलावात विधी करण्यास मज्जाव करून उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बाणगंगेचे पावित्र्य आणि जलचर दोन्ही सुरक्षित राहिले आहेत.(फोटो सौजन्य – AI)
दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला हजारो भाविक पिंडदान व पितृकर्मासाठी बाणगंगा तीरावर येतात. पूजा साहित्यातील तेल, अबीर-गुलाल आणि अफाट निर्माल्य थेट पाण्यात सोडल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडत असत. यंदा पितृपंधरवड्याच्या सुरुवातीलाच काही मासे मृत झाल्याने पर्यावरणप्रेमी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता. या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या ‘डी’ विभागाने तातडीने पावले उचलत कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने यंदा संपूर्ण जलकुंभाभोवती मजबूत बॅरिकेड्स उभारून कोणालाही थेट पाण्यात उतरण्यास किंवा निर्माल्य टाकण्यास पूर्ण बंदी घातली. त्याच वेळी धार्मिक भावनांचा आदर करत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष सोयी करण्यात आल्या. भाविकांच्या स्नानासाठी तलाव परिसरात ३५ ठिकाणी पाण्याचे पाइप्स बसवण्यात आले होते. तसेच पिंडदानाचे विधी निर्विघ्न पार पाडण्यासाठी १० मोठे आणि ५ लहान कृत्रिम पाण्याचे हौद सज्ज ठेवण्यात आले होते. हजारो भाविकांनी या नियमांचे पालन करत कृत्रिम तळ्यांमध्येच विधी पूर्ण केले. दिवसभरात या कृत्रिम हौदांमधून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व कचरा तत्काळ गोळा करून विल्हेवाट लावली, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंखे यांनी दिली.
या मोहिमेच्या यशात परिसरातील पुरोहित वर्गाचा मोठा वाटा राहिला. पालिकेने आधीच स्थानिक ३० ते ४० पंडित आणि रहिवाशांची बैठक घेऊन बाणगंगेचे अस्तित्व टिकवण्यासाठी सहकार्याची हाक दिली होती. पंडितांनी केवळ प्रशासनाला सहकार्यच केले नाही, तर भाविकांनाही कृत्रिम तळ्यांकडे वळवून प्रदूषण रोखण्यास प्रवृत्त केले. स्थानिक नागरिक, पुरोहित आणि पालिका प्रशासनाच्या या संयुक्त शिस्तीमुळे इतिहासात पहिल्यांदाच सर्वपित्रीच्या दिवशी बाणगंगा तलाव पूर्णपणे निर्मळ आणि स्वच्छ राहिला.






