अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल (Photo Credit- X)
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, “जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर खरातला आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमले असते. इतकेच कशाला, निवडणुकांसाठी प्रचारसभा घेण्याचीही गरज उरली नसती; एका जागी बसूनच निवडणुका जिंकता आल्या असत्या.” या उपरोधिक विधानातून त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या मानसिकतेवर प्रहार केला.
LIVE | अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर 🕟 संध्या. ४.४० वा. | २५-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 https://t.co/gVqDuRrDbZ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 25, 2026
महाराष्ट्राला संतांची आणि थोर समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. संतांनी नेहमीच अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे, याची आठवण करून देत फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र धर्म वाढलाच पाहिजे, पण भोंदूगिरीला येथे थारा मिळणार नाही.” जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले नियम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच ते लागू केले जातील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अजूनही अनेक ‘सूरस कथा’ आणि धक्कादायक माहिती समोर येणे बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, “ज्यांच्याकडे या संदर्भात काहीही माहिती असेल, त्यांनी ती तातडीने शासनाकडे द्यावी. या व्यक्तीला अशी शिक्षा करायची आहे की, ज्यामुळे इतरांनाही जरब बसली पाहिजे.”
भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सात गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल करण्यात आले. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्यातील सनदी अधिकारी आणि बड्या नेत्यांसोबत त्याचे घरचे संबंध होते. पोलिसांच्या हाती लैंगिक अत्याचार करतानाचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ आहेत. तसेच त्याचे राजकीय नेत्यांसोबत वैयक्तिक संबंध असल्याचे समोर आले आहे.






