जितेंद्र आव्हाड यांनी सीएम पदासाठी देवेंद्र फडणवीसांविरोधात अशोक खरातने अघोरी पूजा केल्याचा दावा (फोटो - सोशल मीडिया)
भोंदूबाबा अशोक खरात बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सगळा खुलासा केला आहे. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये या भोंदूबाबाने एका पत्रकाराला जीवे मारले असल्याचे देखील सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “या खरातला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे,” असा दावा त्यांनी केला.
हे देखील वाचा : अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !
पुढे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करुन अघोरी पूजा केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, “खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’ असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हे देखील वाचा : अंकातून भविष्य मांडणार भोंदूबाबा गणितात फेल; अशोक खरात 10 वी नापास
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अशा काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे 38 आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे,” अशा शब्दांत पुरोगामी महाराष्ट्रातील सत्यस्थिती जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये मांडली.






