ठाणे – आज महत्त्वाचा व मोठा सण म्हणजे गुढी पाडवा. हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा, या दिवसाला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक, असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काहीजण या दिवशी सोनं (Gold) खरेदी करतात, काही नवीन कार (Car) घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात. तर काहीजण नवीन घरात प्रवेश करतात. तसेच राज्यात आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. (Gudi Padwa Shoba Yatra) तसेच विविध ठिकाणी नववर्षाचं स्वागत शोभा यात्रेनं करण्यात येत आहे.
शोभा यात्रेत सेलिब्रेटींची मांदियाळी…
दरम्यान, आज हिंदू नव वर्षाचे स्वागत शोभा यात्रेनं करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागात शोभा यात्रेत पुरुषासह महिलांनी पारंपरिक वेष परिधान करत शोभा यात्रेत सहभाग घेतला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वेषात, मावळे तसेच इतिहास कालीन वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. महिलांनी पारंपरिक नथ, भरझरी साडी, हिरे, मोती आदी भूषणे परिधान करत बाईक रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी सेलिब्रेटीनी यात्रेत सहभाग घेतला आहे. नागपुरात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. अभिनेत्री गिरिजा ओक तर गिरगावात स्टार प्रवाह मालिकेतील अनेक कलाकारांनी सहभाग घेतलाय. दुसरीकडे डोंबिवलीत हास्य जत्रेतील टिमनं देखील सहभाग घेतलाय.
पारंपरिक वेषात महिलांची बाईक रॅली…
आज शोभा यात्रेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज वेषात, तसेच पेशावे कालीन वस्त्रे परिधान करुन शोभा यात्रेत पुरुषांनी सहभाग घेतला. तसेच मावळे तसेच इतिहास कालीन वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. महिलांनी पारंपरिक नथ, भरझरी साडी, हिरे, मोती आदी भूषणे परिधान करत बाईक रॅली काढण्यात येत आहे. महिलांची ही बाईक रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
शोभायात्रेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सहभागी
डोंबिवली शोभा यात्रेत मुख्यमंत्री सकाळी स्वागतयात्रेत पायी चालत सहभागी झालेत. डोंबिवली हा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे. राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात भव्य नववर्ष स्वागतयात्रा निघत आहे. त्यामुळं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेत सहभागी होत, जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी भरभराटी आणि आनंदाचे दिवस येवोत असा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तर डोंबिवलीत मराठी सेलिब्रेटी देखील शोभा यात्रेत सहभागी झालेत. दरम्यान, दुसरीकडे राज्याच्या उपराजधानीत नागपुरात गुढीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तसेच शोभा यात्रेत देखील सहभागी झाले. यावेळी मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी भरभराटी आणि आनंदाचे दिवस येवोत असा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.