श्रीगोंदा : कोणी काही अपप्रचार करु द्या. माझी बांधिलकी सामान्य जनतेशीच आहे. त्याच जोरावर आगामी विधानसभा निवडणूक (Upcoming Assembly Election) आपण सर्व ताकदीनिशी लढविणार आहोत. सामान्य जनतेच्या भक्कम पाठबळावर व विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक जिंकूच असा ठाम विश्वास घन:शाम शेलार (Ghansham Shelar) यांनी व्यक्त केला. शेलार यांनी भारत राष्ट्र समितीत (Bharat Rashtra Samiti) प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी हे विधान केले.
मागील पंधरवाड्यात समर्थकांसह भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेल्या घन:शाम शेलार यांनी आज श्रीगोंद्यात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील सध्याचे राजकारण दूषित झाले आहे. येथे सध्या कार्यरत असलेल्या कोणत्याच पक्षाला व प्रमुख नेत्यांना जनतेशी, जनतेच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. हे सर्वजण केवळ सत्तामग्न नेते असून, स्वविकासालाच ते प्राधान्य देत आहेत.
याउलट भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केवळ 9 वर्षाच्या सत्ताकाळात राज्याचा विकासात्मक कायापालट करुन खऱ्या अर्थाने बळीचे राज्य साकारले आहे. त्यांची सामान्य जनता व विकासाशी बांधिलकी असून सामान्य माणसांचा बारीक सारीक विचार करणारे जनहिताशी सरकार ते चालवित आहेत. शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा, पाणी, रस्ते, उद्योग अशा सर्वच बाबतीत तेलंगणा सरकारने आदर्शवत व अनुकरणीय कामगीरी केवळ नऊ वर्षात केलेली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व शक्तिनीशी उतरणार
मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व येथील विकासकामांचा बॅकलॅाग भरून काढण्याच्या निर्धारानेच आपण आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व शक्तिनीशी उतरणार आहोत. जनतेच्या पाठबळावर व आशिर्वादाने आपण श्रीगोंदा-नगरची जागा जिंकूच असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले की, राज्यात भारत राष्ट्र समितीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी राज्यभर कार्यरत राहणार आहे.