संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे. या निर्णयामुळे नदी स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५२५ कोटी रुपयांच्या कामांसाठी शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला असून, डिसेंबर २०२५ पासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची संकल्पना भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या ‘व्हिजन-२०२०’ या अभियानातून मांडली होती. या प्रकल्पाने २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही विशेष चर्चेचा विषय बनला होता. दीर्घकाळ पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे मंजुरी मिळाली आहे. या प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळवण्यासाठी सहकार्य केले होते.
प्रकल्पासाठी एकूण १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यातील ५२५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत-२ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक विकास आराखडा
इंद्रायणी नदीच्या विकास आराखड्यात शहर आणि परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्था व संघटनांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या मास्टर प्लॅननुसार नदीकाठी ६० एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र, तसेच वॉटर एटीएम, सार्वजनिक शौचालये, स्ट्रीट फर्निचर, चेन-लिंक फेंसिंग वॉल, आणि बायोडायव्हर्सिटी पार्क यांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये करण्यात आला आहे. या सर्व घटकांना राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्याचे ‘मिनिट्स’ महापालिका प्रशासनाकडे पोहोचले आहेत.
नदी म्हणजे श्रद्धा आणि संस्कृती
इंद्रायणी नदी ही केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नसून, ती पिंपरी-चिंचवड शहराच्या संस्कृती, पर्यावरण आणि आरोग्याशी थेट जोडलेली जीवनवाहिनी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नदी प्रदूषणमुक्त होईल, सुरक्षित व सुंदर किनारे निर्माण होतील आणि नागरिकांना हरित नदीकाठाचा आनंद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला अखेर राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार. डिसेंबर २०२५ पासून प्रकल्पाचे काम सुरू होणार असून, काम वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या प्रकल्पाद्वारे इंद्रायणी नदीला नवजीवन मिळेल. — महेश लांडगे, आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड






