
सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? 'या' मोठ्या नेत्यांची नावं चर्चेत
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण- कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत. सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांनी मिळवला असून, त्यानंतर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत आणि सलग दोन वेळा अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी आणि मंगळवेढ्याचे समाधान आवताडे ते आमदार झाले आहेत.
यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळाले होते. आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करणार याची उत्सुकता आहे. दरम्यान मुंबईतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्री पदे मिळणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री, त्यामुळे आता सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.
हे सुद्धा वाचा : सांगलीत मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत
पण दोन्ही देशमुख आमदार हे ज्येष्ठ आहेत. त्या दोघांनाही मंत्रिपद मिळणार की, या दोघांपैकी एकाला संधी मिळणार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला, परंतु यंदा हक्काचा पालकमंत्री मिळणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आता कुणाच्या रूपात पाहायला मिळतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीला मोठं यश
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याच्या विधानसभा निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. उद्या म्हणजे 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 24 तासातच महाराष्ट्रात नवे मंत्रिमंडळ स्थापन होणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्र निकालाचा आकडा
महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचा आकडा हा 240 वर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांवर निवडून येणं आवश्यक आहे. पण महायुतीला त्यापेक्षाही जास्त 95 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही