जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त
दीपक गायकवाड/मोखाडा: मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरलेली कृषी विभागाची जुनी इमारत अखेर मुसळधार पावसामुळे कोसळून जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही तिचे पालकत्व कोणत्याही विभागाने स्वीकारले नाही. परिणामी ही इमारत मोडून पडली. इमारतीलगत वस्ती असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेबाबत संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाकडे शेतकऱ्यांनी बोट दाखवले आहे.
सन 1972 मध्ये प्रशिक्षण व भेट योजना सुरू झाली होती आणि त्यावेळीच ही इमारत त्या योजनेसाठी हस्तांतरित करण्यात आली होती. यानंतर 1992 मध्ये एक खिडकी योजना अंमलात आल्यानंतर प्रशिक्षण व भेट योजना आणि इतर विभागांचे एकत्रिकरण करून एकच कृषी विभाग कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतरपासून ही इमारत कृषी विभागाच्या अधिपत्याखाली होती. विभागाने इमारतीचा वापर केला, मात्र साधी डागडुजीदेखील केली नाही. परिणामी इमारत अधिकाधिक जीर्ण होत गेली आणि अखेर कोसळली.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…
कृषी विभाग वापरत असलेल्या आवारात अलीकडेच जिल्हा परिषदेने भाडेतत्त्वावरील गाळ्यांचे बांधकाम केले आहे. त्यालाच लागून पूर्वी सरकारी दवाखाना असलेली आणि जिल्हा परिषदेच्या मालकीची आणखी एक मोठी इमारत आहे. त्यामुळे कृषी विभाग वापरत असलेली इमारतही जिल्हा परिषदेच्या मालकीचीच असावी असा निष्कर्ष निघतो. मात्र या इमारतीची जबाबदारी कृषी विभाग स्वीकारत नाही आणि जिल्हा परिषदही पायउतार होत नाही. यामुळेच इमारतीची दुर्दशा झाल्याचा आरोप स्थानिक कास्तकारांनी केला आहे.
गेल्या वर्षी या इमारतीबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग, मोखाडा यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी सदर इमारत धोकादायक नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. पण अवघ्या एका वर्षातच ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.