मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट बैठक संपन्न
भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत – फडणवीस
कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावे – फडणवीस
मुंबई: गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत यावेळी बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण हे आजच्या सादरीकरणाचे क्षेत्र होते.
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the presentation of the draft of the ‘Viksit Maharashtra 2047’ Vision Document.
DCM Eknath Shinde and concerned officials were present.🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'विकसित महाराष्ट्र 2047' व्हिजन… pic.twitter.com/L2ShaWiArr
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2025
सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सादरीकरण अतिशय चांगले झाले असून त्यात डीप थिंकिंग झाले आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. पुढील वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. व्हिजन म्हणजे दिशा; त्यामुळे आपले गोल आणि त्यांची दिशा निश्चित असणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावे, यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे. आपल्या धोरणांची आखणी ह्या व्हिजननुसार झाली पाहिजे. पुढील पाच वर्ष आपण सातत्याने या व्हिजनवर काम केले, तर २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्र राज्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यावर जास्त लक्ष द्यावे. उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञान याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. भारत नेट रिंग लवकरात लवकर विकसित करावी. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य द्यावे. देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांची गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
‘विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७’ ही केवळ कागदावरची योजना नसून प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन महाराष्ट्राचा विकासाचा वेग वाढवेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या व्हिजन डॉक्युमेंटमुळे पुढील दोन दशकांमध्ये महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती निश्चित होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी जलसंपदा, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान, वित्त, आरोग्य, पर्यटन या विषयांच्या व्हिजनचे सादरीकरण करण्यात आले.