अर्जुनी मोरगाव : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara District) विभाजन १ मे १९९९ ला होऊन गोंदिया जिल्ह्याची (Gondia District) निर्मिती झाली. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा (District of Lake) म्हणून ओळखले जातात. गोंदिया जिल्ह्यात अनेक तलाव आहेत. मात्र, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील (Arjuni Morgaon Taluka) अनेक तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. तलाव अतिक्रमणामुळे नामशेष होत आहेत. मात्र, संबंधित विभाग या तलावांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून त्याकाळात मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून व शेतातून मोती पिकवून आपले उदरनिर्वाह होईल, या आशेने मोठ्या काबाडकष्टाने तलावांची निर्मिती केली. तालुक्यात प्रत्येक गावात तलाव आहेत. मात्र १९७१ मध्ये तालुक्यातील नदीला अडवून इटियाडोह धरण (Etiadoh Dam) अस्तित्वात आले. त्यामुळे बऱ्याच गावांना तसेच नवेगावबांध जलाशयाने अनेक गावात शेतीला सिंचन झाल्याने या तलावांकडे जनतेने दुर्लक्ष केले.
गावा-गावातील अनेक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रफळ कमी होऊन अगदी अल्प तलावांमध्ये पाणी साठवणूक केली जाते. तलावांचे क्षेत्रफळ कमी झाल्याने तलावांची पाणी साठवणूक क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळेसुद्धा जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन पाण्याची पातळी खोल जात आहे. निर्माण केलेले व जतन करून ठेवलेले तलाव आज नामशेष होत आहेत. काही दिवसापूर्वी तहसीलदारांनी तलाठी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तलावांची संपूर्ण माहिती मागविली. त्यामुळे तलावांचे पुनर्जीवन होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.