कराड : ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संदीप मोहिते, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची पटकथा कोणत्या माहितीच्या आधारे बनवली. कोणत्या इतिहासकारांकडून ऐतिहासिक संदर्भ घेतले, या प्रश्नासह सरसेनापती यांचे जन्मगाव, समाधीस्थळाचा उल्लेख चित्रपटांमध्ये करण्यात यावा, अशी विनंती प्रत्यक्ष भेटीअंती करण्यात आली. परंतु, या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अपूर्ण माहितीच्या आधारे सिनेमाची निर्मिती झाल्याची शंका निर्माण झाली आहे. यामुळे सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी समस्त मोहिते वंशजांना दाखवण्यात यावा, आम्हा वंशजाच्या पूर्वपरवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित केल्यास नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते यांच्यासह उपस्थित सरसेनापतींच्या वंशजांनी पत्रकार परिषदेत दिला.
“सरसेनापती हंबीरराव” या प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाविषयी सरसेनापतींचे वंशज म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वंशज नितीन मोहिते, जगन्नाथ मोहिते, महेंद्र मोहिते, अनिल मोहिते, केशव मोहिते, प्रविण मोहिते, जयाजी मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने तळबीड गावचे रहिवासी उपस्थित होते.
जयवंतराव मोहिते म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांनी १३ वर्ष स्वराज्याची सेवा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते संभाजी महाराजांना छत्रपती करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
छत्रपतींचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण राहिला आहे. अशा महापुरुषाच्या जीवन चरित्रावर आधारित “सरसेनापती हंबीरराव” हा चित्रपट तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अत्यानंद झाला. सरसेनापती यांचा इतिहास व कार्यकर्तृत्व या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात पोहोचणार ही अभिमानाचीच बाब आहे.
ते म्हणाले, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांनी सिनेमातील पात्र परिचयासाठी सरसेनापतींचे वंशज म्हणून आम्हा बाजी मोहितेंना पुणे येथे बोलावले. चित्रपटाचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही पुणे येथे गेलो. त्यानंतर भोर येथील छायाचित्रीकरण स्थळावर बोलावले तेथेही गेलो. यादरम्यान सरसेनापतींचे व्यक्तिमत्व कसे सादरीकण केले जाणार आहे याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा निर्मात्यांनी केली नाही. मुख्य व्यक्तिरेखा कोणत्या इतिहासकारांना विचारून अथवा कागदपतत्रे व पुस्तकाच्या आधारे तयार करण्यात आली याविषयीची माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, सरसेनापती यांचे जन्मगाव तळबीडचा उल्लेख, चित्रीकरण तसेच ऐतिहासिक पुरातन समाधीस्थळ यांना चित्रपटामध्ये स्थान द्यावे, अशी विनंती वारंवार केली. मात्र तसे घडले नाही.
उलट सरसेनापती हंबीरराव या प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये सरसेनापतींचा इतिहास आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीचा प्रचार आणि प्रसार सादरीकरणाच्या अनुषंगाने होत असल्याचा आम्हा वंशजांचा आक्षेप आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
“सरसेनापती हंबीरराव” सिनेमाचे ट्रेलर प्रसारित झाल्यावर सरसेनापती यांची व्यक्तिरेखा चुकीची दाखवून कधीही भरून न येणाऱ्या असे नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सिनेमा आम्हा समस्त सरसेनापतींच्या वंशज यांना प्रदर्शित करण्यापूर्वी दाखवण्यात यावा. तसेच आमच्या पूर्व परवानगीशिवाय प्रसारित करण्यात येऊ नये, अन्यथा नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जयवंतराव मोहिते व वंशजांनी दिला आहे.
सर्वमान्य छायाचित्राशी छेडछाड
“सरसेनापती हंबीरराव” चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी सोशल माध्यमावर काही चुकीच्या पोस्ट प्रसारित केल्या आहेत. या संदर्भात देखील आम्ही पोलिस तळबीड ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कोणत्याही माहितीच्या आधारे बनावट असे वंशावळ तयार करून संपूर्ण समाजाची दिशाभूल केली आहे. याशिवाय आम्हा वंशजांना सर्वमान्य असणारे सरसेनापती यांचे छायाचित्र यात बदल करून स्वतःच्या वडिलांच्या छायाचित्र यात समाविष्ट केलेल्या प्रतिमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांना देण्यात आल्या आहे.