
सातारा जिल्हा परिषदेत थरारक सत्तानाट्य, मतदानावेळी पोलिसांची मोठी कारवाई; तरीही...
सुत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे दोन्ही राजकीय गटांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या कारवाईवरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, बहुमताचे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अध्यक्षपदासाठी आवश्यक आकडे गाठता आले नाहीत. महाविकास आघाडीचे गणित शेवटच्या क्षणी कोलमडल्याने भाजपने संधी साधत दोन्ही पदांवर विजय मिळवला. या विजयामागे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून मनिषा योगेश फडतरे तर भाजपकडून डॉ. प्रिया शिंदे यांच्यात थेट लढत झाली होती. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अशोक दगडू पाटील आणि भाजपचे राजू भोसले आमनेसामने होते. दुपारी १२.३० वाजता मतदान प्रक्रिया पार पडली, मात्र त्याआधीच घडलेल्या घटनांनी वातावरण तापले होते. या संपूर्ण घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, आगामी काळात या निवडणुकीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी विरोधकांकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडले
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यानंतर भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पण मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ऑपरेशन लोटस राबवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडले.