कोथरूड, कर्वे रस्ता परिसरातील भुयारी मार्गांची दुरवस्था; 'या' आहेत समस्या
कोथरूड : नागरिकांना रस्ते ओलांडण्यासाठी पर्यायी सुविधा म्हणून कोथरूड आणि कर्वे रस्त्यावर अनेक भुयारी पादचारी मार्ग उभारण्यात आले. मात्र, या मार्गांचा वापर अत्यल्प असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. तत्कालीन नगरसेवकांच्या पुढाकारामुळे हे मार्ग उभारले गेले, पण प्रत्यक्षात पादचाऱ्यांच्या गरजांचा विचार न करता हे प्रकल्प राबवले गेले. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे मार्ग आज वापरात नाहीत आणि देखभालीअभावी त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
२०१२ मध्ये सुरू झालेला कोथरूडमधील ‘स्व. चंद्रकांत ऊर्फ अण्णा साने’ भुयारी मार्ग बहुतेक वेळा बंद अवस्थेतच असतो. डहाणूकर कॉलनी परिसरात असलेला हा मार्ग स्थानिकांमध्ये फारसा परिचित नाही. जर नियमित स्वच्छता व सुरक्षारक्षकांची व्यवस्था केली गेली, तर नागरिकांचा विश्वास पुन्हा बसू शकतो.
वनाजमधील भुयारी मार्गाचा वापर नाही
कोथरूड-पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळील ‘नानासाहेब धर्माधिकारी’ भुयारी मार्ग ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झाला. मात्र, शेजारील दारूच्या दुकानांमुळे येथे असामाजिक प्रवृत्तींचा वावर असतो. महिलांना येथे एकट्याने जाणे धोकादायक वाटते. त्यामुळे नागरिक सरळ मुख्य रस्त्यावरून रस्ता ओलांडणंच पसंत करतात.
कर्वेनगरमधील उड्डाणपुलामुळे भुयारी मार्ग अडगळीत
वारजे-कर्वेनगर येथील भुयारी मार्गासाठी २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्च झाले. पण काही वर्षांतच उड्डाणपूल झाल्यामुळे या मार्गाचा उपयोग पूर्णतः थांबला आहे. रहदारी कमी झाल्यामुळे नागरिक रस्ता सरळ ओलांडतात. महिलावर्ग विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गाचा वापर टाळतो.
या आहेत समस्या
दुर्गंधीचा त्रास
भुयारी मार्गांमध्ये दारू पिणे, तंबाखू थुंकणे, उघडं मूत्र विसर्जन, गुटखा पानमसाल्याचे डाग, आणि कचऱ्याचा साठा यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतेची अत्यंत गरज असून, याकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
हे सुद्धा वाचा : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मुश्रीफ स्पष्टचं बोलले; म्हणाले, मी त्यावेळी…