संग्रहित फोटो
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पहिल्यांदाच राज्यातील नेत्यांनी लक्ष घातल्यामुळं अध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरली. गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांना सुरुवातीला अध्यक्षपद देण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तयार नव्हते. मात्र, शेवटच्या क्षणी नविद मुश्रीफ यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मी मत व्यक्त करणार नाही. मात्र मी हतबल होतो, आता नविद मुश्रीफ चेअरमन झाले आहेत. त्यांनी चांगलं काम करावं. या वक्तव्यावरून गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवडीत राज्यस्तरीय नेत्यांनी थेट हस्तक्षेप केल्याची कबुलीच अप्रत्यक्षरीत्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सांगितलं आहे. आम्ही शक्तिपीठ महामार्ग करणार आहोत. ज्या लोकांच्या तक्रारी असतील त्यांना सोडून शक्तिपीठ महामार्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठची भूसंपादन प्रक्रिया रद्द करणारा अध्यादेश आम्ही काढला होता. अजूनही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. तिथून शक्तिपीठ जाऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडं आम्ही प्रयत्न करत आहोत. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी जादा दर मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात स्वबळावर लढू असा पर्याय दिला आहे. यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यात जिथं जमेल तिथं सह आणि जिथं जमणार नाही तिथं शिवाय असा पर्याय आमच्यासमोर आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरही चांगलीच टीका केली, “वास्तविक लक्ष्मण हाके यांची फार मोठी चूक होती. अजित पवार यांच्यासारख्या ४० वर्ष राजकारणात असलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आठ वेळा विधानसभेला निवडून आलेत. ते ६ वेळा उपमुख्यमंत्री झालेत. त्यांनी १२ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. अशा व्यक्तीबद्दल अशी टीका करणं योग्य नाही. त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांबद्दल संतापजनक वक्तव्य करत आहेत. यावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अनेक वेळा सूचना दिली आहे. ते मनमोकळ्या आणि भोळ्या भाबड्या स्वभावाचे आहेत. म्हणून ते अशी वक्तव्यं करतात. यातून शेतकऱ्यांचा अपमान होतो, हे त्यांना समजत नसावं. यातून ते बोध घेतील आणि शेतकऱ्यांचा सन्मान करतील.