सौजन्य - नवराष्ट्र टीम
कुर्डुवाडी/शिरिषकुमार महामुनी : कुर्डू (ता. माढा) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाड्या वस्तीवरील रस्त्याच्या कामासाठी गावातीलच एका तळ्यातील मुरम जेसीबी व टिपरने उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाबरोबर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांत तब्बल तीन तास चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. यावेळी ग्रामस्थांकडून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अखेर या वादावर पडदा पडला. तब्बल तीन तास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसात मात्र रात्री उशिरापर्यंत कोणाचीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
कुर्डू गावातील कापरे वस्तीच्या जवळ असलेल्या एका तळ्यातील मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी गोपनीय बातमीदारामार्फत प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णन यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने रविवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घटना स्थळावर अचानक धाड टाकली. यावेळी जेसीबी व टिपरद्वारे तळ्यातील मुरूम उत्खनन सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र काम ग्रामपंचायतचे सुरू असून आम्ही नियमानुसार रॉयल्टी ग्रामपंचायत मार्फत भरत असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगत काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयपीएस अंजली कृष्णन आणि ग्रामस्थांत शाब्दिक चकमक झाली. यावेळी आयपीएस अंजली कृष्णन यांनी लागलीच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून घटनास्थळी बोलावून घेतले. उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड व तहसीलदार संजय भोसले, पोलिस निरीक्षक अतुल मोहिते दाखल झाले.
ठेकेदाराच्या बिलातून मुरुमाची रॉयल्टी
यावेळी पोलिस प्रशासन व शेतकरी, ग्रामस्थात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र जिल्हा परिषदेचे कामे करताना ठेकेदाराच्या बिलातून मुरुमाची रॉयल्टी कट होत असल्याचे दिसून आल्याने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सूचना आल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे, बाबासाहेब जगताप, संतोष कापरे, विशाल माळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गावची बाजू मांडून काम नियमानुसार होत असल्याचे सांगितले. सायंकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास सर्वजण निघून गेल्याचे दिसून आले.
माढ्याचे तहसीलदार घटनेची संपूर्ण चौकशी करतील. त्यानंतर पुढील काय तो निर्णय घेण्यात होईल, अशी प्रतिक्रीया जयश्री आव्हाड (उपविभागीय अधिकारी माढा.) यांनी दिली आहे.
सूत्राच्या माहितीवरुन आम्ही उत्खननाच्या ठिकाणी गेलो. तहसीलदार, प्रांताधिकारी यांना फोन करुन या घटनेच्या ठिकाणी बोलावून घेतले. महसूल विभाग या प्रकाराची चौकशी करत आहे.
-अंजली कृष्णन (प्रशिक्षणार्थी आयपीएस तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा.)
गावातील तळ्यातील सुरू असलेले मुरुम उत्खनन ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी करण्यात येत होते. त्याची रॉयल्टी ठेकेदाराच्या बिलातून भरली जाते. त्यामुळे ते काम नियमानुसार आहे.
– अण्णासाहेब ढाणे, माजी सरपंच, कुर्डू