पुणे : ‘अशोक चव्हाण यांच्या भाजपसोबत वाटाघाटी बऱ्याच दिवसांपासून चालल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि अजून महत्त्वाचे एक पद पाहिजे होते. ते मान्य झाले नाही. एका दृष्टीने त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरच टाकले आहे. अशोक चव्हाण यांनी ते मान्य केले. त्यांना शुभेच्छा अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर उपहासात्मक टीका केली.
तीन वेळा बदलला कार्यक्रम
अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये कोण जात आहे, अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ‘अशोक रावांच्या प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत जे.पी नड्डा यांच्यासमोर ठरला होता. तो झाला नाही. मग छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरला होता. पण, आरएसएसच्या लोकांनी तीव्र निषेध केला. तिथला शाह यांचा दौरा रद्द झाला. यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत घ्यावा लागला.’
‘पक्षातून कोणताही नेता गेला तरी नुकसान हे होतेच. लोकांना भाजपच्या कार्यशैलीबद्दल चीड आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये असाच आमचा प्रयत्न असतो. पण त्यांची कोणती अपरिहार्यता होती हे आम्हाला माहीत नाही.
भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहतेय
नरेंद्र मोदी आणि भाजप एकीकडे नेत्यांना भ्रष्टाचारी, ७० कोटींचा घोटाळा केला म्हणतात आणि नंतर त्यांना पक्षात सहभागी करून घेतात. नक्की त्यांची विचारधारा काय आहे? किती संधीसाधू राजकारण ते करीत आहेत. हे भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. संसदेच्या अधिवेशनात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेवर केला आहे. यानंतर दोन दिवसांत हा पक्षप्रवेश झाला. सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेसाठी जे सहा उमेदवार दिले आहेत, त्यातील तीन माजी काँग्रेसचेच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Web Title: Throw ashok chavan out of maharashtra politics without rehabilitating him satirical criticism of prithviraj chavan nryb