कराड: कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान पाटील (बी. आर.) यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांना पद स्थापनेमध्ये नवीन ठिकाणी नेमणूक देण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातून दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार वर्ष कराड पोलीस ठाण्याचा कारभार अतिशय खंबीर आणि पारदर्शकपणे बी. आर. पाटील यांनी सांभाळला. कराड शहरातील गुंडगिरी, अवैध व्यवसायांना चाप लावला आहे. परंतु, त्यांना पदस्थापना मिळाली नसल्याने पोलीस दलात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यातील ३२ अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. मात्र त्यांची पदस्थापना झालेली नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकाऱ्यांची मुंबईला रवानगी झाल्याने या अधिकाऱ्यांची मुंबई पदस्थापना होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
भगवान पाटील यांच्या कारर्कीदीत कराड शहरातील काही प्रकरणांची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू होती. या चर्चेच्या अनुषंगाने त्यांची खातेनिहाय चौकशी चालू असल्याचे वावटळ एककाळ सातारा जिल्ह्याच्या पोलीस दलात उठले होते. परंतु, त्यांना राज्यातील कोणत्याही ठिकाणी पदस्थापना देण्यात आली नसल्याने, या चर्चेला अधिक बळ मिळाले असून यात काही तथ्य असल्याची कुजबूज कराड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यात आहे.
इच्छुकांच्या मरळी महाली वार्या…
नवीन येणारे अधिकारी कोण असणार याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. सर्वांचे डोळे नवीन अधिकार्याच्या नेमणुकीकडे लागले आहेत. जिल्हा पातळीवरून अनेकांनी या नियुक्तीसाठी फिल्डींग लावली आहे तर इच्छुकांच्या पाटण येथील मरळी महालात वार्या सुरू झाल्या आहेत.
निःष्पक्ष अधिकार्याच्या नियुक्तीची उत्सुकता..
आ. राणे यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक हिंदुच्या भावना जाणून न घेता हिंदुना चुकीची वागणूक देत असल्याची माहिती मिळाल्याने काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कराताना मी फडणवीस यांना सांगणार असल्याचे सूतोवाच नुकतेच केले आहे. त्यामुळे कराड शहर पोलीस निरीक्षकांची नेमणूक होताना राणेंचा इफेक्ट जाणवणार की निःष्पक्ष अधिकार्याची नियुक्ती होणार याबाबत उत्सूकता लागून राहिली आहे.