सौजन्य फोटो - सोशल मिडीया
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूनंतर तिच्या आई हेमलता तिवारी यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. निधीचे सोनू सिंह नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि त्याच्याकडून तिच्यावर सतत लक्ष ठेवले जात असल्याचा दावा आईने केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलीस त्यांची पडताळणी करीत आहेत.
हेमलता तिवारी यांच्या माहितीनुसार, निधी मोरवा येथील ‘जीएस ग्रँड’ हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्याच काळात एनसीएलच्या आउटसोर्सिंग कामानिमित्त हॉटेलमध्ये राहणाऱ्या पंजाबमधील सोनू सिंहशी तिची ओळख झाली. सोनू एका कंपनीत इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचा दावा करण्यात आला. काही काळानंतर सोनू विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे निधीच्या कुटुंबीयांना समजले. त्यामुळे कुटुंबीयांनी निधीला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दोघांमधील संपर्क सुरूच राहिल्याचे तिच्या आईने सांगितले.
हेही वाचा: Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
सोनू सिंह निधीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवत असल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. निधीच्या कानात अनेकदा ब्लूटूथ असायचे आणि ती सोनूच्या संपर्कात असायची, असा दावा करण्यात आला आहे. घरात नातेवाईक किंवा पाहुणे आले तरी सोनू तिच्याकडे संशयाने पाहत प्रश्न विचारायचा, असेही आईचे म्हणणे आहे. या परिस्थितीमुळे निधी मानसिक तणावाखाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबातील मोठी मुलगी असल्याने ती घराची जबाबदारी सांभाळत होती. बैढन येथे स्वतःचे घर उभारण्याचेही तिचे काम सुरू होते.
घटनेच्या दिवशी निधीने सकाळी घरात देवपूजा केली. त्यानंतर ती वरच्या मजल्यावरील खोलीत गेली. याचदरम्यान तिला सोनू सिंहचा फोन आला होता. फोनवरील संभाषणाबाबत माहिती समोर आलेली नाही. काही वेळाने कुटुंबीयांनी तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी निधी खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवले; मात्र तिचा मृत्यू झाला होता. निधीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरला आहे. निधी आणि सोनू यांच्यातील संपर्क, कॉल डिटेल्स तसेच उपलब्ध तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. मृत्यूमागील नेमके कारण काय होते, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.






