नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व नाशिक लोकसभा संघटक केदा आहेर यांच्या गंगापूररोडवरील नवीन बंगल्याचे काम सुरू असताना बेसमेटमधील बारा फूट भिंत अंगावर कोसळून दोघे मजूर त्याखाली दबून जागीच मरण पावले. तर जखमींवर श्री गुरूजी रूग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
केदा आहेर यांच्या गंगापूररोडवरील सावरकर नगर येथे नवीन बंगल्याचे काम सुरू आहे. बेसमेटमध्ये पार्किंगसाठी खोदकाम केल्यानंतर तीन्ही बाजुंनी संरक्षक भिंत उभारण्यात येत होती. साधारणतः दहा ते बारा फूट उंचीची भिंत उभारण्यात आली. या भिंतीला पाणी मारण्यात आले असताना आजूबाजूच्या काळ्या मातीच्या जमिनीमुळे या भिंतीचा सपोर्ट निघाला.
या ठिकाणी मजूर काम करत असताना अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्याखाली दबून गोकूळ संपत पोटींदे, प्रभाकर काळू बोरसे हे दोघे त्यात जागीच ठार झाले तर रामदास जाधव व संतो दरगोडे हे दोघे मजूर गंभीर जखमी झाले.
पोलिस, अग्निशमन दलाला पाचारण
दुर्घटना घडताच परिसरातील नागरिक व अन्य मजुरांनी तात्काळ बचाव व मदतकार्य सुरू केले. या घटनेचे वृत्त अग्नीशामक दल, पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनीही तातडीने धाव घेतली. यातील जखमींना श्री गुरूजी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.