हायटेन्शन तारांना चुकून हात लागला; मायलेकीला विजेचा जोरदार झटका बसला अन् क्षणात... (File Photo : electricity-shock)
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे अनेक दुर्घटना होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना आता बुलडाण्यात मायलेकीला विजेचा जोरदार धक्का बसला. घराच्या अगदी चार फूट अंतरावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विजतारांचा स्पर्श झाल्याने मायलेकी गंभीर जखमी झाल्या.
लक्ष्मी चव्हाण (वय ४०), मीना चव्हाण (वय १४) अशी जखमी झालेल्या मायलेकीचे नाव आहे. तालुक्यातील टुणकी येथील गजानन लोणकर यांच्या घरावरून उच्च दाबाच्या विजतारा गेल्या आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास लोणकर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या लक्ष्मी चव्हाण या कपडे वाळवण्यासाठी छतावर गेल्या असता त्यांच्या डोक्याला वीज तारेचा स्पर्श होऊन त्यांना जबर धक्का बसला. आपली आई धोक्यात असल्याचे पाहून धावून गेलेल्या मीनाला सुद्धा विजेचा शॉक बसला. या घटनेत तिचा डावा हात पूर्णपणे भाजला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून, तिच्या धाकट्या भावालाही दुखापत झाली आहे.
ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने शेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमधील आई व मुलगी दोघी अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घरावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या तारा हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे टुनकी येथील घटनेपूर्वी वानखेड येथे २६ जुलैला दुर्लक्षितपणामुळे महावितरणच्या राजेंद्र देशमुख (वय ५०) यांचा विजेच्या शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही दुर्घटना घडली.
विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, संग्रामपूर तालुक्यातील मौजे दुर्गादैत्य येथील विज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी महिलेचा विद्यत ताराला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २२) उघडकीस आली. दुर्गादैत्य सुलोचना गजानन कारोळे (वय ५८) ही महिला शेतीच्या कामासाठी गेली असता या महिलेला विद्युत तारेच्या स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणचा बेजबाबदारपणा ठरला कारणीभूत
महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे. शेत शिवारात गट नं १०१ मध्ये येथील ग.भा होता. विजताराबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्यांनी वेळेत दखल न घेतल्याने जीवघेण्या घटना घडत आहेत.