राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं (File Photo)
सांगली : ऐन उन्हाळ्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 117 गावांतील 604 शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत.
दरम्यान, उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र, शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत बागायती पिकांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो. शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वाळवा तालुक्यातील ७० शेतऱ्यांचे १७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
“उन्हाळी भाजीपाला, फळबागाचे नुकसान झाले आहे, उन्हाळ्यातील पाणीटंचाई होती, सामना करत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, हातच गेलं आहे, याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. ”
– राहुल पाटील, शेतकरी