फोटो सौजन्य - Social Media
सोमवारी (दि. ८) जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कृषी, आरोग्य, शिक्षण, डिजिटल सुविधा, पायाभूत प्रकल्प, पशुसंवर्धन आणि युवक कौशल्य विकास अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना स्थिर आणि योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. चिया पिकाचे उत्पादन वाढत असून बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी नमूद केले. भूअभिलेख, सातबारा, फेरफार, भू-नकाशे आणि जमीन नोंदी यासंबंधीच्या सर्व सेवा विलंब न करता वेळेत उपलब्ध कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले.
ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा होत असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे शंकरनारायणन यांनी सांगितले. गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी, उपचार सुविधा, तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य योजनांचा निधी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वापरून नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या.
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना शासन स्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. “सर्वांगीण विकास हा संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. उद्दिष्टे स्पष्ट ठेवून, समन्वय आणि जबाबदारीची भावना जोपासून काम केल्यास वाशिम जिल्हा सर्व निर्देशांकांवर उत्कृष्ट कामगिरी करू शकतो,” असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बैठकीत सांगितले. जिल्हा विकासासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव योग्य पद्धतीने सादर करावेत, असेही निर्देश देण्यात आले.






