26/11
वॉशिंग्टन : मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपीला (26/11 Mastermind) लवकरच अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा (Tahawwur Hussain Rana) याला भारतात प्रत्यार्पणाची परवानगी देण्यात आली आहे. तहव्वूर राणा याचा मुंबई बॉम्बस्फोटात महत्त्वाचा सहभाग होता, असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला होता. भारतानं 10 जून 2020 रोजी एक तक्रार अर्ज करत तहव्वूर राणाला अटक करण्याची मागणी केली होती. या मागणीला बायडेन प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. बुधवारी याबाबत कॅलिफोर्नियाच्या डिस्ट्रिक्ट कोर्टानं 48 पानांचा आदेश जारी केला आहे.
#WATCH | "It is a major breakthrough…extradition order of Tahawwur Rana will help us in many ways, for opening the entire gate of the criminal conspiracy…": Ujjwal Nikam, Special Public Prosecutor during 26/11 Mumbai Terror attack case on extradition of accused Tahawwur Rana… pic.twitter.com/9oe7lF5gm5
— ANI (@ANI) May 18, 2023
राणा दहशतवाद्यांची करीत होता मदत
भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जाची दखल घेत राणाचं प्रत्यार्पण करण्यात येत असल्याचं कोर्टाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. राणा याचा मित्र डेव्हिड हेडली हा लष्कर-ए-तोयबासोबत काम करीत होता. याची माहिती तहव्वूर राणा याला होती, असं कोर्टात अमेरिकन सरकारच्या वकिलांनी सांगितलंय. डेव्हिड हेडलीला संरक्षण देण्याचं आणि कव्हर करण्याचं काम राणा करीत होता. हे दहशतवादी कार्याला मदत करण्याचं काम होतं, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
मुंबईत झाला होता दहशतवादी हल्ला
हेडली मुंबई हल्ल्याचा कट करीत आहे, याबाबतच्या मिटिंग्स आणि हल्ल्याची रणनीती राणाला माहिती होती. यात काही लक्ष्यही निश्चित करण्यात आली होती. राणा या षडयंत्राचा एक भाग होता. त्यामुळं दहशतवादी कृत्यात त्यानं मोठं अपराध केला आहे. असा दावा अमेरिकेच्या सरकारनं केला आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले होते. यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 नागरिक मारले गेले होते. तर 300 जण जखमी झाले होते. अनेक दिवस हा हल्ला सुरु होता. अखेरीस एनएसजीनं हे दहशतवादी ठार केले होते.