संग्रहित फोटो
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतून मोठा दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण ३१६ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती भोयर यांनी दिली. यापैकी पहिल्या टप्प्यात १० हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यात १०७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पुलगाव येथे वर्धा नदीवर आणि आजनसरा येथे यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर प्रत्येकी ४० कोटी रुपये खर्चून मोठ्या पुलांचे बांधकाम सुरू आहे.
Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश
आंजी येथे २६ कोटी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय, तर सेलू येथे ४७ कोटी रुपये खर्चून न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनांमधून वर्धा जिल्ह्यासाठी २४ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १० हजारांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासोबतच गरज भासल्यास जागा खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात ‘लखपती दीदी’ उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्याचेही पंकज भोयर यांनी सांगितले. स्वयंसहायता समूहांशी जोडलेल्या १ लाख ४१ हजार महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांना लखपती दीदी बनविण्याचे काम करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांना अभिवादन केले. स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाच्या मार्गावर नेणे हे मोठे आव्हान होते; मात्र देशासोबत महाराष्ट्रही वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.