महाराष्ट्रभर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती
वर्धा : नागपूर येथे उघडकीस आलेला शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर पुरता मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र प्रतीबिहार होतो की काय असे वाटत आहे. यामुळे घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.
वर्धा येथे आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षक घोटाळ्याबाबत माहिती दिली. नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामध्ये २०१२ ते २०२२ च्या दरम्यान बँक डेटच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे.
दोषींवर दंडात्मक कारवाई करावी
सायबर सेलला तक्रार झाली आणि सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. 11 एप्रिलला नागपूर सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. रोज एक- एक दोघांना अटक केली जात आहे. मात्र, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अशी मागणी आहे, की बोगस नियुक्त झाले असेल तर यावर एसआयटी नियुक्त करून त्या संदर्भात तपासणी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषदमध्ये अधिकाऱ्यांची जी पदं रिक्त होतात ती पदं सीईओने त्या जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार पदभार देण्याची नियमानुसार तरतूद आहे. वर्धा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना मात्र वर्धा शिक्षण माध्यमिक पदाचा प्रभार शिक्षण संचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार उपसंचालक नागपूर यांनी प्राध्यापक मनीषा भडंग यांना दिला आहे.