शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर ( सौजन्य - सोशल मीडिया )
Wardha News : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील ३२ हजार ५३५ आणि शुक्रवारी प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील ११ हजार २६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालये, सहाय्यक निबंधक कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच याद्या तलाठ्यांनाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ३३० शेतकऱ्यांच्या खात्यात २३० कोटी ८२ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे.
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच खासगी बँकांकडून पीक कर्ज घेतलेले आणि ३१ मार्च २०२६ रोजी थकीत असलेल्या एक किंवा अनेक बँकांमधील कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह एकत्रित थकबाकी २ लाख रुपयांपर्यंत असल्यास ती माफ करण्यात येणार आहे. तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असलेली रक्कम प्रथम परतफेड करावी लागेल.
ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंतच्या ओटीएसचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेशही पाठविण्यात आले असून संदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आधारकार्ड व अॅग्रीस्टैंक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र अथवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. सीएससी केंद्रावर विशिष्ट क्रमांक नमूद केल्यानंतर आधार, बैंक खाते अथवा कर्जाची रक्कम मान्य किंवा अमान्य करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मयत – शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या नातेवाईकांनी आधार अमान्य असल्याची माहिती द्यावी. त्यानंतर संबंधितांनी बँक शाखेत जाऊन मृत्यू प्रमाणपत्र सादर करून बँकेच्या नियमानुसार वारसाची नोंद करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
यावेळी वर्धा जिल्हा उपनिबंधक, गौतम वालदे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या ऑनलाइन व ऑफलाइन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा आणि सर्व तालुका सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्याऱ्यांची काही तक्रार असल्यास निवारण कक्षास संपर्क साधावे.”
Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
या योजने अंतर्गत शासनाने बँकांना सुचविलेल्या हेअरकट नुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. संबंधित कर्जखाते ज्या दिवशी एनपीए झाले, त्या दिनांकाच्या आधारे निश्चित सूत्रानुसार कर्जमाफीची रक्कम ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ३१ मार्च २०२६ रोजीच्या थकबाकीपेक्षा कमी रक्कम जमा होईल, अशा प्रकरणात उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी बँकेत जमा करण्याची आवश्यकता नाही. संबंधित रक्कम बँकस्तरावर माफ करण्यात येणार असून, बँकांकडूनही या रकमेची मागणी केली जाणार नाही.






