
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम : शेती बचाव अभियानांतर्गत रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरु येथे तूर पिकाच्या एकात्मिक पीक व्यवस्थापन विषयावर जनजागृती व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांना खरीप हंगामातील शाश्वत व वैज्ञानिक शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्याविशारद टी. एस. देशमुख यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी पेरणीपूर्व मृदा परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत जमिनीच्या आरोग्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच एकात्मिक पोषकद्रव्य व्यवस्थापन, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय आणि जैविक घटकांचा वापर यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
देशमुख यांनी तूर पिकामध्ये आढळणाऱ्या विविध किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पीक संरक्षण उपाययोजनांची माहिती दिली. रासायनिक औषधांवर पूर्णपणे अवलंबून न राहता जैविक उपायांचा वापर, योग्य निरीक्षण आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास पिकांचे नुकसान कमी करता येते, असे त्यांनी सांगितले.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जलसंधारण, मृदा संवर्धन, पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास शेती अधिक शाश्वत बनू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात शेलगाव राजगुरु येथील महिला शेतकरी आणि दिव्य स्पर्श शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा सौ. बालाबाई सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी गृहविज्ञान तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी महिला शेतकरी व बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी रासायनिक खतांचा आणि कृषी रसायनांचा अतिरेकी वापर मानवी आरोग्य, मृदा सुपीकता आणि पर्यावरणासाठी कसा घातक ठरू शकतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतीत पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून सेंद्रिय खत, जीवामृत, घनजीवामृत आणि इतर जैविक निविष्ठांची निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. या उपायांमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच मातीची सुपीकता टिकवून ठेवता येईल, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय ‘पोषण परसबाग’ या संकल्पनेचे महत्त्वही त्यांनी विशद केले. घरच्या घरी विषमुक्त आणि पोषणमूल्यांनी समृद्ध भाजीपाला उत्पादन केल्यास कुटुंबाच्या पोषण सुरक्षिततेला हातभार लागू शकतो. तसेच महिलांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकरी आणि महिलांनी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे स्वागत केले. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक आणि सेंद्रिय शेती पद्धतींचा समतोल साधल्यास शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मार्गदर्शन कार्यक्रमास महिला शेतकरी, बचत गटांच्या सदस्यांसह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाश्वत शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि उत्पादनवाढ यांचा समन्वय साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.